जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तंत्रज्ञान, नवकल्पना आणि युवा बुद्धिमत्तेचा संगम ठरणाऱ्या ‘गोदावरी हॅकॅथॉन 1.0’चे आयोजन गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये १४ मे रोजी करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. १४ ते १५ मे दरम्यान सलग २४ तास चालणाऱ्या या हॅकॅथॉनमध्ये विद्यार्थी विविध तांत्रिक समस्यांवर अभिनव उपाय शोधणार आहेत.
या स्पर्धेसाठी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी निवड प्रक्रियेनंतर अंतिम फेरीसाठी १० संघांची निवड करण्यात आली असून एकूण ३९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सहभागी विद्यार्थी आपल्या कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि टीमवर्कच्या जोरावर विविध प्रकल्प सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर आधारित उपाय विकसित करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची उत्सुकता अधिक वाढली आहे.
या भव्य उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हॅकॅथॉनचे संयोजन डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधी आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विचारांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कौशल्याला दिशा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.



