नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली NEET UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात National Testing Agency (NTA) ने ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी आता Central Bureau of Investigation (CBI) मार्फत केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एनटीएने दिली आहे.
एनटीएने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. पूर्वीची परीक्षा केंद्रे कायम ठेवण्यात येणार असून, पुनर्परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे जारी केली जातील. याशिवाय विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्कही परत करण्यात येणार आहे. नवीन परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

एनटीएने जारी केलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या निष्पक्षतेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्यानंतर ८ मे २०२६ रोजीच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आली होती. तपास यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीनंतर आणि सरकारी मंजुरीनंतर ३ मे रोजी पार पडलेली नीट यूजी परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणामागे पेपरफुटीचे गंभीर आरोप समोर आले आहेत. राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळणारे हस्तलिखित ‘गेस पेपर’ पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे. या गेस पेपरमध्ये तब्बल ७२० पैकी ६०० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील असल्याचे समोर आले आहे.
१० मे रोजी राजस्थान विशेष कृती गटाने (SOG) गुप्त माहितीच्या आधारे डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथे छापेमारी करून १३ संशयितांना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये सीकरमधील एका कोचिंग संस्थेशी संबंधित करिअर समुपदेशकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून, केरळमधील एका एमबीबीएस विद्यार्थ्याने १ मे रोजी सीकरमधील आपल्या मित्राला एक अंदाजपत्रक पाठवले होते. त्यानंतर हा कागद एका पीजी चालकाच्या हाती लागला आणि त्याने तो विविध विद्यार्थ्यांमध्ये वाटल्यामुळे हा पेपर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे समोर आले आहे.
एनटीएने सांगितले की, तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली असली, तरी निष्पक्ष परीक्षा घेण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.



