Home राज्य मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध; इंधन बचतीसाठी सरकारचा मोठा निर्णय

मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध; इंधन बचतीसाठी सरकारचा मोठा निर्णय


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील कोणत्याही मंत्र्याला सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची लेखी मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय विमान वापरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांनी दिली.

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून त्याचे परिणाम भारतातही जाणवू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सरकारी यंत्रणेत खर्च नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

या संदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “तातडीच्या प्रसंगीच विमानाचा वापर केला जाईल. वर्षभरात अत्यावश्यक कामासाठीच मी विमानाने प्रवास करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत व्यस्त असल्याने त्यांना विमानाचा वापर करावा लागतो. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याला विमान वापरता येणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या विभागातील बहुतेक बैठका ऑनलाइन घेतल्या जातात आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज केले जाते.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर इतर मंत्र्यांनीही आपल्या विभागांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. मत्स्य विकास व बंदर मंत्री Nitesh Rane यांनी विभागातील सर्व बैठका ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबत पर्यावरणपूरक प्रशासनाला चालना मिळेल, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री Ashish Shelar यांनीही तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. जागतिक चित्रपट महोत्सवासाठी ‘कान्स’ येथे विभागाकडून कोणालाही पाठवले जाणार नाही. विभागातील सर्व बैठका ऑनलाइन घेण्यात येतील आणि कामकाजासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जागतिक परिस्थिती आणि इंधन संकटाचा उल्लेख करत नागरिकांना काटकसर करण्याचे आवाहन केले होते. “भारताकडे मोठ्या प्रमाणात तेलसाठे नाहीत. त्यामुळे जागतिक संकटाचा थेट परिणाम देशावर होतो. मेट्रो सुविधा असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी मेट्रोचा वापर वाढवावा. तसेच बैठका आणि कार्यालयीन कामकाजासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होमचा वापर करावा,” असे आवाहन त्यांनी केले होते.

दरम्यान, काँग्रेस नेते Nana Patole यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा त्यांनी सत्तेतून दूर व्हावे,” असा घणाघात केला आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound