Home Cities जळगाव जळगावात मातृऋण कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम ठरला चर्चेचा विषय

जळगावात मातृऋण कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम ठरला चर्चेचा विषय


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मातृदिनाचे औचित्य साधत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगावतर्फे विविध क्षेत्रांत कर्तृत्ववान व्यक्तींना घडविणाऱ्या मातांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘आदर्श मातांचा गृह-सत्कार’ करण्यात आला. पारंपरिक कार्यक्रमांपेक्षा वेगळ्या पद्धतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मातृऋण व्यक्त करण्याचा संवेदनशील आणि संस्कारमूल्य जपणारा संदेश समाजात पोहोचला. मातांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. १० मे २०२६ रोजी आयोजित या विशेष उपक्रमात वृक्षसखी तथा वाचन चळवळीच्या कार्यकर्त्या प्रभावतीताई पाटील यांच्या हस्ते यशोदा भगवान भटकर (वय ८२) आणि कमलबाई राणे (वय ८३) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माय माती फाउंडेशनच्या अध्यक्षा वत्सला विश्राम पाटील आणि व्रतस्थ वाचक मनीषा जयंत मोडक (वय ७७) यांचा सत्कार पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. मातोश्री सिंधु सुपडू सुतार (वय ७६) यांचा सन्मान सुवर्णा लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक आदर्श मातांच्या घरी जाऊन कुटुंबीयांच्या हस्ते प्रथम औक्षण आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर पुस्तक भिशीतर्फे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि वाचनीय पुस्तके देऊन मातांचा गौरव करण्यात आला. यावेळी मातांच्या चरणस्पर्श करून त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या.

यशोदा भगवान भटकर यांचा गौरव निर्भीड पत्रकार, विचारवंत आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे प्रा. डॉ. सुधीर भटकर यांना घडविल्याबद्दल करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” या परिवर्तनवादी विचारांचा संस्कार सुपुत्रावर रुजवून तत्वनिष्ठ पत्रकारिता घडविल्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

कमलबाई राणे यांचा सत्कार निवृत्त प्राचार्य एस. एस. राणे यांना समाजसेवेची प्रेरणा दिल्याबद्दल करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’च्या माध्यमातून निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध करून देत शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याच्या कार्यामागे त्यांच्या मातोश्रींचे संस्कार असल्याचे नमूद करण्यात आले.

वत्सला विश्राम पाटील यांचा गौरव वृक्षसंवर्धन, वाचन चळवळ आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत प्रभावती पाटील यांना घडविल्याबद्दल करण्यात आला. तर मनीषा जयंत मोडक यांनी सचोटी, पारदर्शकता आणि उद्योगातून समाजसेवा हा मूल्याधारित संस्कार देऊन लघुउद्योजक सुपुत्र घडविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

मातोश्री सिंधु सुपडू सुतार यांचा गौरव वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल करण्यात आला. पंच्याहत्तरीनिमित्त खर्च टाळून एरंडोल येथील ‘पुस्तकांचा बगीचा’ या मोफत ग्रंथालयाला ७५ पुस्तके भेट देण्यास त्यांनी सुपुत्र विजय लुल्हे यांना प्रेरित केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण आणि सामाजिक प्रबोधनासाठी सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रभावतीताई पाटील म्हणाल्या की, समाजात संवेदनशीलता आणि माणुसकी जपणारे समाजसेवक घडविणाऱ्या प्रसिद्धीविन्मुख मातांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव आहे. अशा मातांचे आशीर्वाद समाजकार्याला नवी ऊर्जा देणारे ठरतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजक विजय लुल्हे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, व्यासपीठावरील दिखाऊ मातृपूजनापेक्षा कुटुंबात जाऊन मातांच्या त्याग, सेवा आणि समर्पणाचा सन्मान करणे अधिक मूल्यवान आहे. मातांचे संस्कार आणि त्यांचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी आकाशवाणी जळगाव केंद्राचे निवृत्त केंद्रनिदेशक तथा साहित्यिक भगवान दादा भटकर, निवृत्त प्राचार्य एस.एस. राणे, गुरुमाऊली सुरेखा राणे, साहेबराव पाटील, देवेंद्र मोडक, निवृत्त शिक्षिका दिप्ती मोडक, कॅप्टन विश्राम पाटील आणि माय माती फाउंडेशनचे संस्थापक सुहास पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound