Home करियर जपानमध्ये करिअरची सुवर्णसंधी! भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवासापासून राहण्यापर्यंत सर्व खर्च सरकार करणार

जपानमध्ये करिअरची सुवर्णसंधी! भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवासापासून राहण्यापर्यंत सर्व खर्च सरकार करणार


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । जपानी कामाची संस्कृती समजून घेण्याची आणि जपानमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या भारतीय पदवीधर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जपान सरकारच्या Ministry of Economy, Trade and Industry (METI) तर्फे परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ‘METI Japan Internship Program 2026’ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही इंटर्नशिप पूर्णपणे फुल्ली फंडेड असून निवड झालेल्या उमेदवारांचा प्रवास, निवास आणि इतर खर्च जपान सरकारकडून केला जाणार आहे.

या इंटर्नशिप कार्यक्रमात भारतीय विद्यार्थ्यांना जपानी कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन आणि इन-पर्सन अशा दोन स्वरूपात राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ऑनलाइन इंटर्नशिप २४ ऑगस्ट २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार असून सहभागी विद्यार्थी भारतातूनच जपानी कंपन्यांसोबत काम करू शकतील. तर प्रत्यक्ष जपानमध्ये होणाऱ्या इन-पर्सन इंटर्नशिपसाठी दोन बॅचेस ठेवण्यात आल्या आहेत. पहिली बॅच ७ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असेल, तर दुसरी बॅच ४ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ३९ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच उमेदवार बॅचलर किंवा मास्टर डिग्रीच्या अंतिम वर्षात शिकत असावा किंवा पदवीधर असावा. उमेदवाराला इंग्रजी किंवा जपानी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून जपानी कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय विस्तारामध्ये योगदान देण्याची इच्छा असणेही गरजेचे आहे. याशिवाय अर्जदाराने यापूर्वी जपानमध्ये कोणतीही नोकरी केलेली नसावी.

ही इंटर्नशिप विशेषतः इंजिनिअरिंग, संशोधन, दुभाषी सेवा, सेल्स, लीगल आणि अकाउंटिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जपानी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे उमेदवारांना आंतरराष्ट्रीय अनुभवासोबतच जागतिक करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होणार आहेत.

ऑनलाइन कोर्ससाठी निवड झालेल्या उमेदवारांना जुलै महिन्यापर्यंत माहिती देण्यात येईल, तर इन-पर्सन कोर्ससाठी निवड झालेल्यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये कळवले जाईल. ऑनलाइन इंटर्नशिप २० दिवसांची असेल, तर जपानमध्ये प्रत्यक्ष होणारी इंटर्नशिप ३० दिवसांची असणार आहे.

अधिक माहिती आणि अर्जासाठी उमेदवारांनी METI Internship Program Official Website ला भेट द्यावी.

जपानमध्ये करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय युवकांसाठी ही इंटर्नशिप मोठी संधी मानली जात आहे. फुल्ली फंडेड स्वरूपामुळे आर्थिक अडचणींशिवाय आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्याचा मार्ग या कार्यक्रमातून खुला होणार आहे.


Protected Content

Play sound