जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत विविध संस्थांमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर अशासकीय पदे भरण्यात येणार आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह जळगाव व रावेर तसेच माजी सैनिक विश्रामगृह येथे रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरती प्रक्रियेत सभागृह व्यवस्थापक (पुरुष) या पदासाठी २ जागा उपलब्ध असून, या जागा माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह जळगाव व रावेर येथे भरण्यात येणार आहेत. तसेच वसतिगृह सहायक अधीक्षक (पुरुष) पदासाठी १ जागा असून ती सैनिकी मुलांचे वसतिगृह, जळगाव येथे आहे. याशिवाय सफाई कर्मचारी कम एमटीएस (पुरुष) पदासाठी २ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे १ आणि माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह जळगाव येथे १ जागेचा समावेश आहे. चौकीदार कम एमटीएस (पुरुष) पदासाठी एकूण ४ जागा असून, सैनिकी मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह जळगाव आणि रावेर येथील सभागृहासाठी प्रत्येकी एक जागा उपलब्ध आहे.

स्वयंपाकी (महिला) पदासाठी २ जागा असून, या दोन्ही जागा सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी आहेत. काही पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना संबंधित ठिकाणी निवासी स्वरूपात २४ तास सेवा द्यावी लागणार आहे. भरती प्रक्रियेत पात्र माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार असून, माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. स्वयंपाकी पदासाठी माजी सैनिकांच्या पत्नी किंवा विधवा महिलांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच माजी सैनिक उमेदवारांनी ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती २४ जुलै २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२४१४१४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



