



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि आधुनिक अध्यापन पद्धती आत्मसात करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्राध्यापक डॉ. बापूराव बीटे यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आयोजित Advanced Course in Medical Education (ACMC) हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नोडल सेंटर म्हणून कार्यरत असलेल्या मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय, परळ येथे या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेत आधुनिक वैद्यकीय शिक्षणातील विविध संकल्पना आणि कौशल्यांचा अभ्यास केला. या प्रशिक्षणादरम्यान आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, प्रभावी मूल्यमापन तंत्र, अभ्यासक्रम नियोजन, अध्यापनातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर तसेच प्रभावी शिक्षक म्हणून आवश्यक नेतृत्व कौशल्ये याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणातील गुणवत्तावाढ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
अभ्यासक्रमादरम्यान पोस्टर सादरीकरणाच्या माध्यमातून सहभागी प्राध्यापकांना आपले संशोधन, शैक्षणिक अनुभव आणि अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम सादर करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विविध राज्यांतील वैद्यकीय शिक्षकांमध्ये ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण होण्यास मदत झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमात डीन डॉ. अजय भांडारवार, डॉ. संतोष साळगरे, नोडल सेंटरचे समन्वयक डॉ. प्रवीण अय्यर, डॉ. राखी त्रिपाठी, डॉ. मुनीरा हिरकानी, डॉ. संतोष धोढी यांच्यासह अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या गरजा आणि आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. बापूराव बीटे यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणातील नवीन अध्यापन तंत्र, नेतृत्व विकास आणि विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी व परिणामकारक शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. “नेतृत्व शिकणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. सतत शिकत राहणे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हेच या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. डॉ. बापूराव बीटे यांच्या या यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहकारी प्राध्यापक, वैद्यकीय कर्मचारी आणि व्यवस्थापनाने त्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



