जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील श्वानांची सुरक्षा आणि सोय लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्ह्यांचा तपास आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वानांना कर्तव्यावर नेण्या-आणण्यासाठी २ विशेष मॉडिफाइड टेम्पो क्रूझर व्हॅन जळगाव पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या अत्याधुनिक वाहनांमुळे श्वानांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
सध्या जळगाव पोलीस दलात एकूण ५ श्वानांचा समावेश आहे. यामध्ये ३ बेल्जियम मालिनोस, १ जर्मन शेफर्ड आणि १ डॉबरमन प्रजातीचा श्वान कार्यरत आहे. या ५ श्वानांपैकी २ श्वान हे बॉडी नाईट सर्च (BNS) म्हणजेच गुन्ह्यांचा तपास व शोधकार्यासाठी वापरले जातात, तर ३ श्वान हे बॉम्ब शोधक व नाशक पथकात (BDDS) कार्यरत आहेत. गुन्हे उघडकीस आणणे, व्हीआयपी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत या श्वानांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

यापूर्वी या श्वानांना तपासासाठी किंवा कर्तव्याच्या ठिकाणी घेऊन जाताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन जळगाव पोलिसांनी खास श्वानांच्या गरजेनुसार बनवलेल्या २ टेम्पो क्रूझर व्हॅन ताफ्यात समाविष्ट केल्या आहेत. या वाहनांमध्ये श्वानांना बसण्यासाठी विशेष मॉडिफाइड जागा तयार करण्यात आली असून, प्रवासादरम्यान त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी वाहनाच्या मागील भागात खास एसी व्हेंट्स (AC Vents) बसवण्यात आले आहेत.
या नवीन अत्याधुनिक व्हॅनमुळे जळगाव पोलीस दलाच्या श्वान पथकाची कार्यक्षमता अधिक वाढणार असून, कोणत्याही तातडीच्या प्रसंगी हे पथक अधिक वेगाने आणि सक्षमतेने घटनास्थळी पोहोचू शकणार आहे.



