Home Cities जळगाव चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजना ; अर्ज करण्याचे आवाहन

चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या विविध योजना ; अर्ज करण्याचे आवाहन

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चर्मकार समाजातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, जळगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, जळगाव यांच्या माध्यमातून चर्मकार समाजातील नागरिकांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये चांभार, मोची, ढोर आणि होलार समाजातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगार व आर्थिक प्रगतीसाठी मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. महामंडळामार्फत ५० टक्के अनुदान योजना तसेच बीज-भांडवल योजना राबविण्यात येणार आहे. या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायवृद्धीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार असून, समाजातील गरजू घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.इच्छुक नागरिकांनी आपले अर्ज संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे तातडीने सादर करावेत. योजनेसंदर्भातील अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२६४४६४ वर संपर्क साधता येणार आहे.


Protected Content

Play sound