Home Cities जळगाव ‘कला संस्कार शिबिरा’साठी ४० बालकांचा चमू कोल्हापूरकडे रवाना

‘कला संस्कार शिबिरा’साठी ४० बालकांचा चमू कोल्हापूरकडे रवाना


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच कलेच्या माध्यमातून त्यांच्या मनावर संस्कार व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगाव जिल्ह्यातील ४० बालकांचा चमू उत्साहात कोल्हापूरकडे रवाना झाला. कोल्हापूर येथील पवित्र कणेरी मठात होणाऱ्या या निवासी शिबिराचे आयोजन बालरंगभूमी परिषदेमार्फत करण्यात आले असून जळगाव जिल्हा शाखेने या बालकांच्या प्रवासाचे नियोजन केले आहे.

दि. १० मे ते १२ मे २०२६ या कालावधीत पार पडणाऱ्या या तीन दिवसीय निवासी शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पारंपारिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे शिबिर पूर्णपणे विनामूल्य असून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यावर या शिबिरात भर दिला जाणार आहे.

शिबिरादरम्यान चित्रकला, मास्कमेकिंग, नृत्य, नाट्य आणि संगीत यांसारख्या कलाविषयक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला चालना दिली जाणार आहे. तसेच प्रार्थना, श्लोक पठण, योगाभ्यास आणि प्राणायामाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची ओळख मुलांना करून दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेल्या पारंपारिक आणि मैदानी खेळांची माहितीही मुलांना या शिबिरात अनुभवता येणार आहे.

लगोरी, खो-खो, कबड्डी, भोवरा, विटीदांडू आणि पतंग उडवणे यांसारखे पारंपारिक खेळ प्रत्यक्ष खेळण्याची संधी शिबिरार्थींना मिळणार आहे. याशिवाय स्वसंरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ‘लाठी-काठी’ प्रशिक्षणाचे विशेष सत्र तज्ज्ञांकडून घेतले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी ‘सर्पज्ञान’ या विषयावर शास्त्रीय माहिती देऊन सापांविषयीचे गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

ग्राम्यजीवनाची ओळख करून देणाऱ्या या शिबिरात मुलांना भारतीय संस्कृती आणि ग्रामीण परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या जगप्रसिद्ध ‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालया’लाही भेट देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृती, जीवनशैली आणि परंपरांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

इच्छादेवी चौकातून ट्रॅव्हल्सने रवाना झालेल्या बालचमूला निरोप देण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, विविध पदाधिकारी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपल्या संस्कृतीची जवळून ओळख होते,” असे मत कमल राजाराम वाणी प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र माळी यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरच्या कणेरी मठात होणारे हे शिबिर जळगावच्या बालकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असून या शिबिरातून मुले नव्या कौशल्यांसह अधिक आत्मविश्वासाने परततील, असा विश्वास बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound