पुणे-वृत्तसेवा । पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या गंभीर प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून, सहा अधिकाऱ्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे.
नसरापूरमधील घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी आंदोलन करत पुण्यातील नवले पूल काही काळ बंद केला होता. लोकभावना लक्षात घेऊन तपास जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी सरकारकडून एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे.

या एसआयटीमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, एकूण सहा अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तपासाची सर्व जबाबदारी या विशेष पथकाकडे सोपवण्यात आली असून, प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
१ मे रोजी नसरापूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली होती. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला आरोपीने फूस लावून गोठ्यात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्न केला. दुपारी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मृत अवस्थेत आढळून आली.
घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसत असल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. या अमानुष कृत्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, एवढ्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपीने कोर्टात आपल्यावरचा आरोप नाकारत “ही किरकोळ मारामारीची केस आहे” असे धक्कादायक विधान केल्याने संताप अधिकच वाढला आहे.
या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे दोन गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते, मात्र पुराव्याअभावी तो सुटला होता. त्यामुळे यावेळी तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
दरम्यान, चिमुकलीवर शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिच्या वडिलांनी भावनिक भूमिका घेत “मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही नेत्यांनी आम्हाला भेटायला येऊ नये,” असे स्पष्टपणे सांगितले. पुढाऱ्यांकडून केवळ फोटोसेशनसाठी भेट दिली जाते, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची भावना असून, प्रशासनावर जलद आणि कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे



