Home क्राईम चोपड्यात गोमांस विक्री प्रकरणी एकाला अटक; १५ ते २० किलो मांस जप्त

चोपड्यात गोमांस विक्री प्रकरणी एकाला अटक; १५ ते २० किलो मांस जप्त

0
1

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  चोपडा शहरातील मोमीन गल्ली परिसरात गोमांसाची विक्री होत असल्याच्या माहितीवरून चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून सुमारे १५ ते २० किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी २१ वर्षीय युवकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१४ जुलै) सकाळी पोलिस निरीक्षक पवन देसले यांना मोमीन गल्ली परिसरात गोमांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान अकमल जावीद कुरेशी (वय २१) हा आपल्या घराच्या ओट्यावर मांसाची विक्री करत असल्याचे आढळून आले.

छाप्यात संशयिताच्या ताब्यातून सुमारे १५ ते २० किलो वजनाचे मांस जप्त करण्यात आले. प्राथमिक पाहणीत हे मांस गोवंशाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी मांसाची प्राथमिक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेतील पुढील तपासणीसाठी जप्त केले, तर उर्वरित मांस पंचनामा करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी चंदन विष्णू पाटील यांच्या फिर्यादीवरून अकमल जावीद कुरेशी (रा. मोमीन गल्ली, चोपडा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम ५(क) व ९(अ) अन्वये चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जप्त केलेल्या मांसाच्या प्रयोगशाळा अहवालाची प्रतीक्षा आहे. पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.


Protected Content

Play sound