जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव पहूर रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सॅन्ट्रो कारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप गाडीने जोरात धडक दिल्याची घटना घडली असून या भीषण अपघतात ४७ वर्षीय प्रौढाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अमीनौद्दीन कमरौद्दीन (वय ४७, रा. पहूर पेठ) हे आपली सॅन्ट्रो कार (क्र. MH-04-FA-8041) घेऊन जळगाव रोडवरील संतोष बनकर यांच्या गॅरेजसमोर थांबले होते. ते गाडीतून उतरून गॅरेज मालकाशी बोलत असतानाच, जळगावकडून पहूरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. MH-19-CY-9202) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय वेगात आणि निष्काळजीपणे चालवले.

या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत उभ्या असलेल्या कारला आणि तिला लागून उभ्या असलेल्या शेख अमीनौद्दीन यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शेख अमीनौद्दीन यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याची दुदैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सलीम शेख अनिस शेख यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राहुल पाटील करत आहेत.



