Home क्राईम लुटीची थरारक कथा ठरली बनावट; चौकशीत नोकरानेच दिली कबुली

लुटीची थरारक कथा ठरली बनावट; चौकशीत नोकरानेच दिली कबुली

0
5

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  थोरगव्हाण येथील सरकारमान्य देशी दारू दुकानातील व्यवसायातून जमा झालेली ₹१ लाख ९८ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा बनाव करणाऱ्या नोकराचाच भांडाफोड सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत केला. विश्वासाने सोपविलेली रक्कम स्वतःच अपहार करून खोटी लुटीची कथा रचल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपीला अटक करून त्याच्याकडून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. या जलद आणि प्रभावी तपासामुळे सावदा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फिर्यादी राजेंद्र भागवत जयस्वाल (वय ६०, रा. पंचमुखी हनुमान नगर, रावेर) यांच्या थोरगव्हाण येथील सरकारमान्य देशी दारू दुकानात शेख सुफियान शेख अतीक (वय २०, रा. नागझीरी रोड, इमामवाडा, रावेर) हा कामगार म्हणून कार्यरत होता. दुकानाच्या व्यवसायातून जमा होणारी रोकड विश्वासाने त्याच्याकडे देऊन रावेर येथे पोहोचविण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.

दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता शेख सुफियान हा थोरगव्हाण येथून ₹१,९८,००० इतकी रोकड घेऊन रावेरकडे निघाला. त्यानंतर सावदा–रावेर मार्गावरील राजदीप पेट्रोलपंपाजवळ, वाघोदा बु. परिसरात दोन अज्ञात व्यक्ती पल्सर मोटारसायकलवर आले आणि पैशांची पिशवी हिसकावून पळून गेले, अशी माहिती त्याने मालकाला व पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तसेच थोरगव्हाण ते वाघोदा बु. या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, कथित लुटीचा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे शेख सुफियान याची सखोल चौकशी सुरू केली.

कसून चौकशीदरम्यान शेख सुफियान याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. मालकाने विश्वासाने दिलेली रोकड स्वतःच अपहार करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लुटीचा बनाव रचल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०६ ची भर घालण्यात आली. आरोपीला अटक करून त्याच्याकडून संपूर्ण ₹१,९८,००० ची रोकड जप्त करण्यात आली. अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावून संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात सावदा पोलिसांना यश आले. या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका निलेश बाविस्कर, विनोद तडवी, संजीव चौधरी, उमेश पाटील, पोना सुनील सैंदाणे, पोकाँ मयूर पाटील, पोकाँ संजय तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनिरीक्षक पवार आणि सफौ सुनील दामोदरे यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

विश्वासाचा गैरफायदा घेत मालकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकराचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश करून संपूर्ण रक्कम परत मिळवली. या कारवाईमुळे खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे.


Protected Content

Play sound