जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर रिक्षाचालक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
परिवहन विभागाच्या नव्या निर्णयानुसार, रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी आणि परवाना (Permit) मिळवण्यासाठी चालकाला मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात १ मेपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन ने या निर्णयाच्या विरोधात एल्गार पुकारला असून ४ मे पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यापैकी मुंबई महानगर प्रदेशातच सुमारे ५ लाख चालक संपावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
संघटनांच्या मते, भाषेची सक्ती करणे अन्यायकारक आहे. सरकारने आदेश तातडीने मागे घेतला नाही, तर संपासोबतच दररोज तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. संपापूर्वी युनियनचे शिष्टमंडळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.
हा वाद मिटला नाही तर राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः रेल्वे स्थानके, बस डेपो आणि विमानतळ परिसरात प्रवाशांची मोठी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२८ एप्रिल रोजी होणारी सरकार आणि रिक्षाचालक संघटनांमधील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास ४ मेपासूनचा संप निश्चित मानला जात आहे.



