पुणे-वृत्तसेवा । राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र पाठवत आपली दावेदारी मांडली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे. 2 मे रोजी अर्जांची छाननी होणार असून, 4 मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 12 मे रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे.

आपल्या पत्रात रूपाली पाटील-ठोंबरे यांनी गेल्या 20 वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम केल्याचा उल्लेख केला आहे. पुणे महानगरपालिकेत माजी नगरसेविका आणि शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पदवीधर निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद हा आपल्या जनाधाराचा पुरावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहातील नियम, प्रक्रिया आणि कामकाजाचे सखोल ज्ञान असल्याचे सांगत त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर ठाम व आक्रमक भूमिका घेण्याची तयारी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून दुर्बल घटकांसाठी आवाज उठवण्याचा आपला अनुभवही त्यांनी अधोरेखित केला.
दरम्यान, महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असताना रूपाली पाटील-ठोंबरे यांनी थेट उमेदवारीची मागणी केल्याने पुणे राष्ट्रवादीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. आता पक्षश्रेष्ठी त्यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात आणि पुण्यातून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



