Home Cities एरंडोल हातात कोयता घेवून पोलीस ठाण्यात गोंधळ; एकाला अटक !

हातात कोयता घेवून पोलीस ठाण्यात गोंधळ; एकाला अटक !


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस ठाण्यात आपल्या ओळखीच्या संशयितांना अटक का केली नाही, या कारणावरून एका तरुणाने पोलीस ठाण्यातच गोंधळ घालत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एरंडोल पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना समाधान राधो अहिरे (वय ३२, रा. केवडपुरा, एरंडोल) हा तरुण हातात धारदार कोयता घेऊन पोलीस ठाण्यात शिरला. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांकडे ‘तुम्ही वरील आरोपींना अटक का केली नाही’, असा जाब विचारत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हातात असलेल्या कोयत्याने पोलीस ठाण्यातील भिंतीवरील टीव्हीवर वार केले, ज्यामुळे टीव्हीची वायर तुटून तो बंद पडला. इतकेच नाही तर त्याने सीसीटीव्ही प्रणालीच्या मॉनिटरवर कोयत्याने वार करून नुकसान केले.

सरकारी कामात अडथळा निर्माण करत असतानाच, संशयित समाधान अहिरे याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी मुकेश आमले यांच्या अंगावर धारदार कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस कर्मचारी दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात संबंधित संशयित आरोपी समाधान अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound