जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवान परशुराम पालखी सोहळ्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. घरोघरी उत्स्फूर्त स्वागत, टाळ-मृदंगाचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांमुळे हा सोहळा विशेष आकर्षण ठरला.
निवृत्ती नगरातील श्री हनुमान मंदिर येथून सायंकाळी सहा वाजता या पालखी सोहळ्याला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. टाळ, मृदंग, ढोल-ताशांच्या निनादात आणि लेझीम नृत्याच्या सादरीकरणात भगवान परशुरामाचा जयजयकार करत शोभायात्रा पुढे सरकत होती. मार्गात एसएमआयटी कॉलेज परिसरातून होत ही यात्रा प्रेम नगरातील श्री सप्तश्रुंगी मंदिरात पोहोचली. रस्त्यातील प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन करून भव्य स्वागत केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीभावाने भारावून गेला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती विशेष ठरली. चिमुकले राम मंदिराचे प.पू. श्री दादा महाराज जोशी, जळगाव जनता बँकेचे सतीश मदाने, वेद पाठशाळा प्रमुख प.पू. श्री देवेंद्र गढीकर गुरुजी, हभप मुकुंद महाराज धर्माधिकारी, शिवसेना जिल्हा उपसंघटक तसेच ब्राह्मण संघर्ष समिती समन्वयक सौ. अर्चना सुरडकर, भाजपा स्वीकृत नगरसेवक सुभाष शौचे, ब्रह्मश्री संस्थेच्या संस्थापक महिला अध्यक्ष रेखाताई कुळकर्णी, अजय कुळकर्णी, पालखी प्रमुख प्रसाद पटवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री सप्तश्रुंगी मंदिरात आयोजित कार्यक्रमात भगवान श्री परशुराम प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प.पू. श्री दादा महाराज जोशी यांनी ब्राह्मण समाज हा समाजाचा आदर्श असून संस्कार जपणे आणि कुटुंब सुदृढ करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. सनातन धर्माचे पालन करत समाजात एकोपा राखणे आणि भेदभाव दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सौ. अर्चना सुरडकर यांनी आपल्या भाषणात महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली. मुलींनी भीती न बाळगता अन्यायाचा सामना करावा आणि समाजाने त्यांना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी सांगितले. पालकांनीही आपल्या मुलांच्या संस्कारांवर लक्ष केंद्रित करावे, कारण जीवनात केवळ पैसा नव्हे तर इभ्रत आणि मूल्येही महत्त्वाची आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक सुभाष शौचे यांचा सत्कार करण्यात आला. वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी रामरक्षा पठण करून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मश्री संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



