जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, २० एप्रिल रोजी निषेध आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दि. ११ एप्रिल रोजी दुपारी साडेएक वाजेच्या सुमारास रिंगरोडवरून जात असताना ५ ते ६ मोटारसायकलस्वारांनी सपकाळे यांच्या वाहनाला अडवून चारही बाजूंनी घेराव घातला. त्यानंतर दगडफेक करत त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या हल्ल्यात स्कॉर्पिओ वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सपकाळे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून विशाल राजू अहिरे याचे नाव पुढे आले असून त्याच्यासह इतर साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतरही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच संबंधित आरोपींवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या हल्ल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर परिणाम झाला. कविसंमेलन, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले, तसेच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक संघटनांनी आरोपींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच २४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कठोर पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना मुकुंद सपकाळे, वासंती दिघे, वैशाली झाल्टे, अजय पाटील, वंचित आघाडीचे प्रा. प्रीतिलाल पवार, ऍड. आनंद कोचुरे, संजय सपकाळे, भीमसेना जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव, मोनू अडकमोल, कानळदा ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे, चेतन नन्नवरे, विजयकुमार मौर्य, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते.



