जळगाव प्रतिनिधी । काल विधानसभेत एकनाथराव खडसे यांनी केलेल्या उल्लेखामुळे बिथरलेल्या कथित हॅकर मनीष भंगाळे याने त्यांना उद्देशून आपण जीवंत असल्याचे ट्विट केले आहे.
याबाबत वृत्त असे की, विधानसभेच्या या पंचवार्षीकमधील शेवटच्या दिवशी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अतिशय भावूक होऊन भाषण केले. ते म्हणाले की, ३० वर्षांपासून मी सभागृहाचा सदस्य असून मी अनेकदा सत्ताधार्यांवर आरोप केले. तथापि, माझा प्रत्येक आरोप हा पुराव्यावर आधारित होता. तथापि, मनीष भंगाळे नावाच्या कथित हॅकरने दाऊदच्या बायकोसोबत माझे संभाषण केल्याचा आरोप केला. आणि मीडियाने काहीही विचार न करता याला अमाप प्रसिध्दी दिल्याचा खडसे यांनी उल्लेख केला. यावेळी त्यांनी हा मनीष भंगाळे कोण ? तो सध्या कुठे आहे ? तो जीवंत आहे की मेलाय ? असे उदगार काढले.
दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्याला आज मनीष भंगाळे याने ट्विटरवरून उत्तर दिले आहे. खडसे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलला मेन्शन करून त्याने आपण जीवंत असल्याचे नमूद केले आहे. आय विल गेट बॅक यू सर ऑन धिस…आय एम स्टील अलाईव्ह असे ट्विट त्याने केले आहे.
दरम्यान, मनीष भंगाळे याने एकनाथराव खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून न आल्यामुळे त्याला मध्यंतरी अटक करण्यात आली होती. अनेक महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. त्याने आता पुन्हा एकदा खडसे यांना जाहीर आव्हान दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
I will get back to you sir on this ..still I am alive….https://t.co/H3NsjeIz9w @EknathKhadseBJP
— Manish Bhangale (@bhangale_manish) July 3, 2019