भरदार ट्रकच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चुकीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (४५, रा. सदोबा नगर, जळगाव) हे ठार झाले. हा अपघात शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता राष्ट्रीय महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान झाला. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सदोबा नगरातील रहिवासी योगेश ढाके हे नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता काम संपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीपी ४६६०) घरी परतत होते. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून राँग साईडने एक ट्रक (क्र. एमएच १८, बीजी २९३७) नशिराबादकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेले व ते ठार झाले. अपघातानंतर दुचाकी ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांमध्ये अडकली व ती तशीच ५० ते ६० मीटरपर्यंत फरपटक नेली.

अपघातानंतर ट्रक मधोमध थांबला होता. त्यामुळे रहदारीलादेखील अडथळा झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, संजय महाजन, पोकॉ सागर भिडे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी ढाके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तसेच क्रेन बोलवून दुचाकी काढली व ट्रक रस्त्याच्या बाजूला केला. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे.

Protected Content