मोदी आणि शाह यांची हत्त्या करण्याविषयी सूचित करणाऱ्या तामिळ लेखकाला अटक

nellai kannan

चेन्नई, वृत्तसंस्था | एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून प्रसिद्ध लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान मोदी आणि शाह यांची अजून हत्या का करण्यात आली नाही, असे तामिळ लेखक नेल्लई कन्नन याने म्हटले होते. त्यावरून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कन्नन यांना अटक केली आहे.

 

तामिळ लेखक नेल्लई कन्नन याने २९ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध करत असताना त्यांनी मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेरंबलूर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्यांवरून वाद प्रतिवाद सुरू आहे. राजकीय पक्षांनी या कायद्याचा विरोध केला आहे. त्यातच तामिळनाडूतील सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) या कायद्याविरोधात आंदोलन केले. आंदोलनात बोलताना नेल्लई कन्नन याने वादग्रस्त विधान केले आहे. “मला आश्चर्य वाटतंय अजूनपर्यंत मुस्लिम समाजातील लोकांनी मोदी आणि शाह यांची हत्या का केली नाही”, असे विधान त्याने केले होते. त्याच्या वक्तव्यानंतर संतप्त पडसाद उमटले.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेल्लई याला अटक व्हावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी मरीना बीच येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये पोन राधाकृष्णनन, सीपी राधाकृष्णनन, एल. गणेशन आणि एच. राजा यांचा समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, नेल्लई याच्याविरोधात १५ पेक्षा अधिक खटले दाखल झाले आहेत. तसेच भारतीय दंडसंहितेतील तीन कलमांतर्गंत एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. नेल्लई यांना अटक केल्यानंतर भाजपाचे सचिव एच. राजा यांनी ट्विट करुन याप्रकरणी त्यांचे मत नोंदविले.

Protected Content