मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्या जाणार्या अवैध गुटख्यावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करत दणका दिला आहे.
मध्यप्रदेशात गुटख्यावर प्रतिबंध नसल्याने येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध गुटख्याची तस्करी होत असते. यातील सर्वात जास्त माल हा मुक्ताईनगरमार्गे जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी जात असतो. मुक्ताईनगर पोलिसांनी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करीवर कारवाई केली असून आज सकाळी पोलीस निरिक्षक नागेश मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा मोठी कारवाई केली आहे.
महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर आज नागेश मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांनी एमएच ३० बीबी ७९१६ क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या मारूती इको कारची झडती घेतली असता यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असणार्या गुटख्यांच्या पुड्या आढळून आल्या. या गुटख्यासह संबंधीत वाहन पोलिसांनी जप्त केला असून या एकत्रीत ऐवजाचे मूल्य सुमारे १२ लक्ष ८२ हजार ६४० रूपये इतकी आहे.
या संदर्भात, पोलीस अंमलदार प्रवीण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अक्षय गजानन गुळवे ( वय २५, बोराखेडी ता. मोताळा ) आणि सुदाम रामराव व्यवहारे ( वय ४०, रा. फर्दापूर ता. मोताळा ) या दोन्ही जणांना अटक करून गुटखा आणि याला वाहून नेणारे वाहन जप्त केले आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्कर धास्तावले आहेत.