यावल वन विभागाच्या कार्याला यश; विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला काढून केली सुखरूप सुटका

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंगोणा गावात एका शेतातील पंचवीस फुट खोल विहिरीमध्ये कोल्हा पडल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातुन वन विभागाला कळवली असता सदरची माहिती मिळताच वन विभागाच्या पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे व कर्मचारी जागेवर पोहोचले. ही विहीर २५ फुट खोल, भोवताली केळीची गर्द दाट झाडी, तसेच कठडे नसल्याने वन्य प्राणी पडला व त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढणे वनअधिकाऱ्यांचे प्रथम कर्तव्य होते. विहीरीत पाणी नसल्याने प्राणी सुरक्षित होता.

सुरवातीला जाळे टाकुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बरेच प्रयत्न करूनही कोल्हा वन विभागाच्या प्रयत्नांना दाद देत नव्हता. रात्र असल्याने व माती धसण्याची शक्यता असल्याने विहीरीत उतरणे कठीण होते, तसेच विहीर उतरले तर कोल्हयाकडून हल्ला होण्याचा धोका होता. शेवटी रात्री १ वाजता कोल्हयाने वर यावे अशी व्यवस्था करत वन कर्मचारी माघारी परतले. त्यानंतर कालांतराने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली, पण तो कोल्हा दिसला नाही. मात्र त्यांची शोध मोहीम सुरू होती.आसपासच्या शेतकऱ्यांना सुध्दा सूचना करण्यात आले की विहीरीत कोल्हा दिसल्यास लगेच वन विभागाला कळवावे. ३१ मार्च रोजी सकाळी यावल वनविभाग पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे यांच्या आदेशानुसार बि.बि. गायकवाड, गणेश चौधरी, सचिन चव्हाण व वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन, नागपूरचे संचालक अजिंक्य भांबुरकर यांचा चमु कोल्हा शोधमोहीमेसाठी विहिरी जवळ गेला.

जवळपास तासाभरानंतर कोल्हा हा विहीरीत असलेल्या मातीच्या बिळातून बाहेर आलेले दिसले. लगेच पथकाने सोबत असलेला पिंजरा चारही बाजूने दोऱ्याने बांधून ते विहीरीत सोडण्यात आले. तरी पण बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा कोल्हा पिंजऱ्यात आला नाही व विहीरीत असलेल्या मातीच्या बिळात लपून बसला. शेवटी जीवाची पर्वा न करता शिडीच्या सहाय्याने यावल पूर्व विभागाचे नाकेदार बि. बि. गायकवाड व वाहनचालक सचिन चव्हाण विहिरीत उतरले व जाळी टाकून कोल्हयाला पकडले व पिंजऱ्यात टाकले. त्यानंतर तो पिंजरावर सुरक्षितरित्या काढण्यात आला व एका वन्य जीवाला जीवदान देण्यात यश मिळाले. त्यानंतर स्वप्नील फंटागरे यांच्या आदेशा नुसार वड्री धरणाजवळच्या वन जंगलात त्या प्राण्यास सुखरूप सोडण्यात आले. सदरची यशस्वी शोधमोहीम ही यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनखाली यशस्वी परिश्रम घेण्यात आले.

Protected Content