नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसच्या ६ आमदारांनी क्रॉस वोटिंग केली. त्यामुळे राज्यातील विधानसभा अध्यक्षांनी त्या ६ आमदारांचे निलंबन केले होते. या ६ बंडखोर आमदारांना २९ फेब्रुवारी रोजी सभागृहात निलंबित करण्यात आले होते.
बंडखोर आमदारांमध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजिंदर राणा, इंदर दत्त लखनपाल, चेतन्या शर्मा आणि देविंदर कुमार भुट्टो यांचा समावेश आहे. या विरोधात बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांनी अध्यक्षांच्या या निलंबनावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे हा खटला सुरू आहे, आता हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठाणिया यांना नोटीस पाठवत कोर्टाने त्याचे मत मागविले आहे. कोर्टाचे खंडपीठ यावेळी असेही म्हणाले की जोपर्यंत हे प्रकरण प्रलंबित आहे, तोपर्यंत काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात आणि कोणत्याही मतदानमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. याप्रकरणी आता पुढची सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेनंतर सभागृहाचे प्रभावी संख्याबळ ६८ वरून ६२ वर आले आहे, तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४० वरून ३४ वर घसरली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने या सहा जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 मे रोजी होणार आहे.