मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल भाजपतर्फे एकनाथ खडसे यांचा निषेध करण्यात आल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे खडसेंच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
सध्या ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार आंदोलनांची स्पर्धा सुरू झाली आहे. ठिकठिकाणी खडसेंच्या समर्थनार्थ वा विरोधात आंदोलने सुरू आहेत. मुक्ताईनगरात कालच भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले. यात माजी जि.प. सभापती अशोक कांडेलकर यांनी अतिशय तीव्र शब्दांमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडले.
या आंदोलनानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने आमदार खडसे यांच्या समर्थनार्थ आणि गिरीश महाजनांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर गिरीश महाजनांचा धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.