जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम होत असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांनी केलेला सत्कार हा कायम स्मरणात राहणार असून यामुळे आपण भारवल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते समाजकल्याण खात्यासह महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वंसंध्येला अजिंठा शासकीय विश्रामगृहाच्या आवारात समाजकल्याण खाते आणि खानदेश लोक कलावंत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कलावंतांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजकल्याण अधिकारी विजयसिंह रायसिंग, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश पाटील, ज्येष्ठ कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष भोकर येथील दत्तात्रय सोनवणे, समिती सदस्य चंद्रकांत भंडारी, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, उपजिल्हा प्रमुख नाना सोनवणे , तालुका संघटक रविंद्र चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कलावंतांनी सादर केली लोककला
जिल्हाभरातून आलेल्या लोक कलावंतांनी आपल्या पारंपारिक वेशभूषित व वाद्यसह लोककलेचा जागर पालकमंत्री नंदा गुलाबराव पाटील यांचे उपस्थित केला यात प्रामुख्याने वासुदेव वाघ्या मुरळी गोंधळी वही गायन शाहीर वट टिंगरी या लोककलांच्या सादरीकरणाने पालकमंत्र्यांसह उपस्थित भारून गेले होते. याप्रसंगी खानदेश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ कंसात सेंसार बोर्ड यावर निवड झाल्याबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
खानदेश लोक कलावंत विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद ढगे यांनी प्रास्ताविकातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आजवर खंबीरपणे कलावंतांच्या पाठीशी उभे असल्याबद्दल आभार मानत त्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी कलावंतांच्या उपस्थितीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आपल्या मनोगतात म्हणाले की, मी स्वत: कलावंत होतो, अनेक नाटकांमधून मी भूमिका केल्या आहेत. येथून मिळालेल्या स्टेज डेअरिंगमुळेच मी राजकारणात यशस्वी झालो. जर राजकारणात गेलो नसतो तर नक्कीच यशस्वी नट झालो असतो. मला कला आणि कलावंतांविषयी आस्था असून त्यांच्या अडी-अडचणींची जाणीव आहे. सध्या अनेक कला लयास जात असून आता जिल्ह्यात फक्त दोन टिंगरी वादक उरलेले आहेत. ही कला आणि कलावंत जगले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या कठीण काळात आम्ही कलावंतांना तब्बल ४६ लाख रूपयांची मदत केली असून राज्यात इतकी मदत कुठेही करण्यात आलेली नाही. तसेच गेल्या चार वर्षांपासून अतिशय पारदर्शकपणे कलावंत मानधन समिती ही ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यीकांची या योजनेसाठी निवड करत असून यामुळे त्यांना हक्काचे वेतन मिळत आहे.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, कलावंतांच्या पाठीशी शासन आणि मी स्वत: खंबीरपणे उभा आहे. जिल्ह्यात अतिशय सुसज्ज असे लोककला भवन उभारण्यात येणार असून यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे भवन उभारण्यात येणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक संजय दुसाने यांनी केले तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजयसिंह रायसिंग यांनी मानले.