मू.जे. महाविद्यालयात ‘पत्रकार दिन’ साजरा

जळगाव प्रतिनिधी | मू.जे.महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला.

गुरुवार, दि.६ जानेवारी रोजी संपन्न या कार्यक्रमात, “बातमीतील घटना, घटना घडण्यामागे असलेले राजकीय सामाजिक व आर्थिक प्रवाह व शक्ती आणि घटनांचे संभाव्य परिणाम यांचे विश्लेषण करणे, वाचकांना सुजाण करणे, घटनांबद्दलची मर्मदृष्टी देणे आणि त्यांना आपले मत बनविण्यासाठी सहाय्य करणे या गोष्टींचाही अंतर्भाव पत्रकारितेत दिसतो. काळ जसा बदलत आहे तसे माध्यम सक्षम होताना दिसत आहेत…” असे विचार प्राचार्य अशोक राणे यांनी मांडले.

यावेळी प्राचार्य डॉ.अशोक राणे, योगेश शुक्ल आणि जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.संदीप केदार यांनी प्रतिमापूजन केले. शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी ‘दर्पणकार, बाळशास्त्री जांभेकर’ यांच्याविषयी माहिती देत पत्रकारितेत होत असलेले बदल आव्हानात्मक असून यात विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमास फोटोग्राफर संजय जुमनाके, प्रा.केतकी सोनार उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात योगेश शुक्ला यांनी ‘एक दिवशीय पेजीनेशन’ कार्यशाळेत वृत्तपत्रातील बदलते तांत्रिक बदल, खिळे टंक छपाई ते डिजिटल छपाई प्रवास त्यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल भालेराव याने केले तर प्रा.संदीप केदार यांनी प्रस्तावना मांडत आणि आभार प्रदर्शन केले.

Protected Content