पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नाचणखेडा शिवारात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र गोपीनाथ पाटील ( वय ४२ ) हे जोगलखेडा शिवारातील महादू लक्ष्मण वनारसे (राहणार नाचनखेडा तालुका जामनेर) यांच्या शेतात कपाशी वेचण्याचे काम करीत होते. यातच रानडुकराने त्याच्यावर हल्ला करून हातांना, पायांना, चावा घेऊन गंभीर जखमी केले. अशा अवस्थेत असताना लागलीच १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलावून त्याला पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले.
या हृदयद्रावक घटनेमुळे जोगलखेडा गावात दुःखाचे सावट पसरले आहे. मयत जितेंद्र गोपीनाथ पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. याबाबत जोगलखेडा तालुका जामनेर येथील पोलीस पाटील विजय त्र्यंबक पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.