जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरा येथे वर्ग झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलीसांनी निलेश भाईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात भाईटे यांना गंभीर गुन्ह्यात अडकविण्यासाठी विजय भास्कर पाटील आणि किरणकुमार साळुंखे यांनी कटकारस्थान करून घरात अनधिकृतपणे प्रवेश करत धारदार सुरा घरात ठेवला अशी तक्रार निलेश भाईटे यांनी केली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव नुतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचा वादा अनेक वर्षांपासून पाटील आणि भोईटे गटात सुरू आहेत. निलेश भाईटे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विजय भास्कर पाटील आणि किरणकुमार साळुंखे यांच्यासह इतर साथीदारांनी निलेश भोईटे यांच्या घरी पुण्यातील कोथरूड पोलीस छापा कारवाईसाठी आल्यानंतर दस्तऐवज कसे दाखल करायचे व ते छापा कारवाईत हस्तगत झाले असे दाखवायचे तसेच घरात रक्ताने माखलेला सुरा कसा ठेवायचा, असे कट कारस्थान रचून पत्रकारांना खोटी माहिती दिली. तसेच निलेश भोईटे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून घरातील महत्वाचे दस्तऐवज, प्रोसिडींग बुक, रबरी स्टॅम्प, बँकेचे चेकबुक, लेटरपॅड व इतर साहित्य बनावट करण्यासाठी घरातून घेवून गेले असे फिर्यादीत नमूद केले आहे. निलेश भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील, किरणकुमार साळुंखे व इतर साथीदारांवर शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड करीत आहे.