अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिवद येथे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस व नुकसान करणाऱ्या गाव डुकरांच्या कायमचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी दहिवद येथील शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. या संबंधीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले असून ‘वेळेत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवू.’ असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
दहिवद येथील गावाच्या वेशीवर शेत-शिवारात शेतकऱ्यांचे क्षेत्र असून दरवर्षी गावांतील मोकाट फिरणारे डुकरे शेतातील उभ्या पिकांची नासधूस करत असून त्यांचा उभ्या पिकांत कायमच हैदोस सुरू असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊन आर्थिक हानी होत असते. शेतात मका, कपाशी, बाजरी, ज्वारी, भाजीपाला व इतर अनेक पिके शेतकरी घेत असतात. या पिकांची नेहमी डुकरांकडून हानी होत असते. हाती आलेला शेतमाल डुकरांमुळे वाया जात असतो.
उत्पन्नाचे एकमेव साधन शेती असून ‘पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे आमचा उदरनिर्वाह कसा करावा ?’ हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन देखील करावा लागत आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी वेळोवेळी डुकर मालकांकडे तक्रार करुनही त्यांच्याकडून डुकरांचा योग्य तो बंदोबस्त केला जात नसून उलटपक्षी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खोट्या केसेसच्या धमक्या देण्याचा प्रकार व शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या मारण्याचा धमकीवजा प्रकार केला जात असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी संबंधित कार्यालय प्रमुखांना तक्रारी देऊनही अद्यापही कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याचे सांगत शेतकरी बांधव मंगळवार दि, २७ नोव्हेंबरपासून ग्राम पंचायतच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत डुकरांवर योग्य ती उचित कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. यासंबंधीचे सुनिल पाटील व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, आमदार, जिल्हाधिकारी, वनक्षेत्रपाल अमळनेर, पारोळा, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.