जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ‘तालुक्यात कृषी विद्यालय आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. येथील शेतकरी संघ संचालक मंडळांनी पाच वर्षात चांगले काम केले असून त्यामुळे संस्था ही ‘अ’ वर्ग झाली असल्या’चे प्रतिपादन जामनेर येथील शेतकरी संघ सर्वसाधारण सभेत बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जामनेर येथील बाबाजी राघो मंगल कार्यालयमध्ये शेतकरी संघ सभासदाची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन, भाजप नेते पद्माकर महाजन, शेतकरी संघ चेअरमन चंद्रकांत बाविस्कर, व्हाईस चेअरमन बाबुराव गवळी, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते छगन दादा झाल्टे, अॅड. शिवाजी सोनार, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, विलास पाटील, तुकाराम निकम, शेतकरी संघ संचालक रमेश नाईक, सुरेश पाटील, रघुनाथ पाटील, अनिल पाटील, नाना पाटील, राजेंद्र पाटील, संजय देशमुख यांच्यासह शेतकरी संघ संचालक व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “मागच्या काळामध्ये शेतकरी संघ ही संस्था डबघाईत गेली होती. कारण काही ठराविक लोक या संस्थेचे मक्तेदार झाले होते त्यामुळे संस्था खड्ड्यात टाकण्याचं काम मागच्या संचालक मंडळांनी केलं. त्यानंतर गेल्या पाच वर्षात तोट्यात गेलेली संस्था संचालक मंडळाने चांगल्या प्रकारे कामकाज करून नफ्यात आणली आहे. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे अनेक हिताचे काम करण्यात आले त्याचबरोबर व्यापारी संकुलन यांच्यासह अद्यावत असे कार्यालय उभारण्यात आले आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी संघाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यात कृषी विद्यालय यासाठी परवानगीसाठी आपण प्रयत्न करू.” असे आश्वासन यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिले.
येत्या दोन वर्षांमध्ये जामनेर तालुक्यातील भागपूर योजना असेल वाघूर सिंचन प्रकल्प असेल यांच्यासह अनेक प्रकल्प पूर्ण करून जामनेर तालुक्यातील सुमारे पन्नास हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचा मानस असल्याचे त्यावेळी त्यांनी बोलून दाखवले.
‘जामनेर शेतकरी संघाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे चांगले कामे केली जात असून संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामुळे तोट्यात गेलेली संस्था आता नफ्यात आली असून अ वर्गात आल्या’ची माहिती आपल्या प्रास्ताविकमध्ये बोलताना शेतकरी संघ चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली. सर्वसाधारण सभेला शेतकरी व शेतकरी सभासद संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.