मुंबईतील नालेकाठावरील बहुमजली झोपड्या हटवणार – मुख्यमंत्री

30BMDEVENDRAFADNAVIS

मुंबई (वृत्तसंस्था) मुसळधार पावसानंतर तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून नाल्यांच्या रुंदीकरणाचे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी नाल्यांजवळील चार मजली झोपडपट्ट्या हटवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर पालिकेला दिले आहेत. कडक भूमिका घेऊन ही कारवाई करण्यात येणार असून झोपड्या काढण्याला विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात येणार असून, स्थलांतराला विरोध करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुंबईतील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या स्थितीवरून मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पदसाद उमटून मोठा गदारोळ झाला. त्यानंतर झालेल्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना झोपड्या हटवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबईतील नाल्यांवर तसेच नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून, पाणी साचण्याच्या दृष्टीने हीच मोठी समस्या असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होणार’:- मुंबईतील नाल्यांवर तसेच मिठी नदीसारख्या नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले. त्याचप्रमाणे मुंबईतील नाल्यांचे, नद्यांचे काही ठिकाणी प्रवाह बदलण्यात आले असून असे प्रवाह बदलणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईत नेमका कुठे, कसा आणि किती पाऊस झाला याची माहिती शासनाकडे असून, मुंबईत नेमके कुठे-कुठे पाणी साचते याचा अभ्यास करून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील नालेसफाईचे धोरण महापालिकेने तयार करून ते घोषित करावे, असे निर्देश आपण महापालिकेला दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी:-  मालाड येथील झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जखमी झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. शिवाय १४ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

‘महापालिकेनेही ५ लाख रुपये द्यावेत’ :- तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी पाच लाख रुपये देणार असून महापालिकेनेही त्यांना पाच-पाच लाख रुपये द्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त लोकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Protected Content