एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ‘नंदगाव – भवरखेडे फाट्यावर बोगदा बनवावा.’ अशी मागणी रुपेश रामा माळी व इतर शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
एरंडोल येथील जवळपास सातशे शेतकऱ्यांची जमीन नंदगाव भवरखेडे फाट्याच्या रस्त्याला आहे; तसेच नंदगाव व भवरखेडे या गावांच्या लोकांना एरंडोल येथे येण्यासाठी व गावी परत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. चौपदरी करण्याच्या कामात फाट्यावर बोगदा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे आत्ताच या फाट्यावर बोगदा तयार करण्यात यावा. अशी मागणी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जर या जागेवर बोगदा झाला नाही तर अडीच किलोमीटर जाऊन मोठा वळसा घेऊन वाहनधारकांना व पादचार्यांना जावे लागणार आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी नंदगाव फाट्यावर अंडरपास तयार करणे अत्यावश्यक आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.