ईडीच्या चौकशीआधी सोनियांना कोरोनाची लागण !

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

सोनिया गांधींना  कोरोनाची  लागण झाल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला  यांनी ही माहिती दिलीय. सुरजेवालांनी असंही सांगितलंय की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झालीय.

सुरजेवाला म्हणाले की, बुधवारी सोनिया गांधींना सौम्य ताप आला होता, त्यानंतर कोविड चाचणीत त्या पॉझिटिव्ह आल्या. ते पुढं म्हणाले, सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला वेगळं केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय, त्यांची प्रकृती ठीक आहे.’

राहूल आणि सोनिया गांधी यांना कालच ईडीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी ८ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, सोनियांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या चौकशीला सामोरे जातील की नाही ? याबाबत संभ्रम आहे. तर ८ जूनपूर्वी सोनिया गांधी बर्‍या होतील, अशी आशा सुरजेवालांनी व्यक्त केलीय. दरम्यान, राहूल गांधी हे सध्या विदेशात असल्याने ते ईडीच्या चौकशीसाठी मुदत वाढून मागण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

 

Protected Content