एरंडोल/अमळनेर प्रतिनिधी | एकीकडे रावेर येथे एक कोटींची ब्राऊन शुगर जप्त करून महिलेस अटक केली असतांना दुसरीकडे पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणातील फरार आरोपी नंदू बेलदार याला देखील गजाआड केले आहे.
एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील काही जणांचे गांजा तस्करीशी धागे जुडलेले असल्याचे आधीच निष्पन्न झालेले आहे. यातील नंदू बेलदार हा आरोपी फरार झालेला होता. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या गांजा साठा प्रकरणातील वनकोठे गावाचे कनेक्शन असल्याचे समोर आले होते. यात नंदू बेलदार याच्याशी संबंधीत चौकशी देखील करण्यात आली होती. याच नंदू बेलदारवर अमळनेर पोलीस स्थानकात १२ जुलै २०२१ रोजी गांजा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून घरापासून फरार असलेला नंदू बेलदार हा कासोदा येथील एका विवाहासाठी आला असतांना त्याला अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याआधी नंदलाल ऊर्फ नंदू रतन बेलदार याच्यावर सन २०१७ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिस ठाण्यात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल आहे. यात त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून चार किलो गांजा जप्त केला होता. या खटल्यातही तो जामीनावर बाहेर होता. तर आता त्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.