मुंबई : वृत्तसंस्था । अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी लाखो रुपये खर्च कऱण्यावरुन आमदार नितेश राणेंनी आता सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारवर सेलिब्रिटींना पैसे पुरवल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
अनेक सेलिब्रिटी अचानक महाराष्ट्र सरकारबद्दल चांगलं लिहायला लागलेत, हे सरळ सरळ पीआर कॅम्पेन असल्याचा आरोप केला आहे. कोणकोणत्या सेलिब्रिटींना पैसे दिले त्याबद्दलचा पुरावासुद्धा आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ट्विटमध्ये ते म्हणतात, “फक्त उपमुख्यमंत्रीच नाही तर तुम्ही कलाकारांचे ट्विट्स, इन्स्टाग्राम पोस्ट बारकाईने पहा. खूप कलाकार अचानक महाराष्ट्र सरकारबद्दल चांगलं लिहायला लागले आहेत. हे तर सरळ सरळ प्रसिद्धीसाठीचं कॅम्पेन आहे. सगळेजण अचानक आदित्य ठाकरेला हिरो म्हणून दाखवायला लागले आहेत. हे समोर यायला हवं. शेवटी हा लोकांचा पैसा आहे.”
पुढच्या ट्विटमध्ये तर या सेलिब्रिटींना किती पैसे देण्यात आले याबद्दलही बोलत आहेत. “बी लिस्टच्या सेलिब्रिटींना २ ते ३ लाख रुपये दिले जातात. ए लिस्टचे कलाकार फार महाग आहेत, त्यांना त्यापेक्षाही जास्त पैसे पुरवले जातात. रोज सकाळी उठून त्यांना सरकारबद्दल चांगलंचुंगलं लिहायला सांगितलं जातं. बॉलिवूडवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला जातो. सेलिब्रिटींना सेना भवनातून फोन पण जातात. आणि हे सगळं टॅक्स भरणाऱ्यांच्या पैशातून!”
त्यांचं हे ट्विट सध्या चांगलंच गाजत आहे. या ट्विटवर एका युजरने कमेंट केली आहे की, जे सेलिब्रिटी पैसे घेऊन सरकारची प्रसिद्धी करतात, त्यांची यादी आहे का तुमच्याकडे? त्यावर नितेश राणे यांनी आपण या सगळ्यांना विधानसभेतच उघडं पाडणार असल्याचं सांगितलं आहे.