भुसावळ प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी अंतरीम जामीनाची मागणी केली नसून २४ मार्चला झालेल्या कामात न्यायालयाने प्रतिपक्ष सरकारला नोटीस काढून पुढील सुनावणीत ७ एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती चौधरींच्या वकिलांनी दिली आहे.
शहरातील ममता सुधाकर सनांसे यांनी नवशक्ती आर्केडमधील गाळे खरेदी प्रकरणी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींविरुद्ध २३ जानेवारीला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात चौधरींनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. येथे दि.२४ रोजी न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी ७ एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणात अर्जदार अनिल चौधरी यांच्या वकिलांनी अंतरीम जामिनाची मागणी केलेली नाही. यामुळे अंतरिम जामीन फेटाळला किंवा नाकारल्याचा प्रश्नच नाही. ही चुकीची माहिती पसरवली जात आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रतिपक्ष सरकारला नोटीस काढली आहे. ७ एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात चौधरींनी अद्याप अंतरिम जामिनाची मागणीच केली नाही, यामुळे अंतरिम जामीन नाही अशा आशयाची माहिती चुकीची असल्याची माहिती अनिल चौधरी यांचे वकील योगेश दलाल यांनी दिली आहे.
या प्रकरणी सुधाकर सनान्से यांनी अनिल चौधरी यांना जामीन नाकारल्याची प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती चुकीची असून त्यांच्या जामीनावर ७ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचेही अॅड. योगेश दलाल यांनी स्पष्ट केले आहे.