भुसावळात ‘लेडीज इक्वलिटी रन’चे आयोजन

भुसावळ, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स अॅन्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘बिसारा लेडीज इक्वलिटी रन सीजन- 2’चे आयोजन करण्यात येणार आहे. तीन, पाच आणि दहा किमी या श्रेणींमध्ये या रन संपन्न होणार आहे.

यावर्षी रविवार, दि.२७ मार्च २०२२ रोजी या रन सीजनचे आयोजन करण्यात येणार असून १२ वर्षांवरील सर्व महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे. असे संयोजिकाद्वय डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी सांगितले.

त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने नावनोंदणी करता येईल. नावनोंदणी गुरुवार, दि.३ मार्चपासून सुरू होणार असून ऑनलाइन नोंदणीसाठी www.bhusawalsara.com या संकेतस्थळावर व ऑफलाईन नोंदणीसाठी सुप्रभा एक्सिडेंट हॉस्पिटल व डॉ. संजय नेहेते हॉस्पिटल त्याचबरोबर योगशिक्षिका पुनम भंगाळे यांचे गोदावरी नगर मधील निवासस्थान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक महिला स्पर्धकास टी-शर्ट, पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर स्पर्धेच्या दिवशी ठराविक अंतरावर स्पर्धकांसाठी पाणी, पेयजल, फळांचे व्यवस्था करण्यात येणार असून रन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकासाठी नाश्त्याची व्यवस्था असणार आहे.
याशिवाय या आयोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी प्रत्येक स्पर्धकास २० दिवस मोफत धावण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी दर मंगळवार, गुरुवार व रविवार सकाळी ५.४५ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस. ग्राउंड) उपस्थित राहावे. असे आवाहन प्रवीण फालक यांनी केले आहे. रविवार, दि.६ मार्च रोजी प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात येणार असून याप्रसंगी धावण्याच्या आधी करायचा वार्मअप, धावताना घ्यावयाची खबरदारी व धावल्यानंतर संभाव्य इजा टाळण्यासाठी आवश्यक असलेली स्त्रेचींग एक्सरसाइजची संपूर्ण माहिती देण्यात येईल.

दरवर्षी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे दि.८ मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त सदर रन आयोजित करण्यात येतो. परंतु मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व यावर्षी कोरोनाचे तिसरी लाट ओसरल्यानंतर तयारीसाठी पुरेसा वाव मिळावा यासाठी ही रन दि.२७’ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. मागील वर्षी ७ मार्च रोजी आयोजित रन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्या वेळी नाव नोंदणी केलेल्या महिला स्पर्धकांना या वेळी नव्याने नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. असे प्रवीण पाटील यांनी सांगितले.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या नियमित धावण्याच्या कार्यक्रमानंतर यावेळी उपस्थित महिला धावपटूसोबत चर्चा करण्यात आली. त्या वेळी सर्वच महिला धावपटूतर्फे उत्साहात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ.स्वाती फालक, डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, आरती चौधरी, ममता ठाकूर, पूनम भंगाळे, सीमा पाटील, मिनी जोसेफ, निलांबरी शिंदे, छाया चौधरी, पूजा बलके, सरला पाटील, प्रिया पाटील, हर्षा लोखंडे, चारुलता अजय पाटील, रूपा अग्रवाल, विजया पाटील, पल्लवी देशमुख या महिला धावपटू उपस्थित होत्या.

Protected Content