मुंबई –भाजपचे नेते मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणा गृहमंत्री देशमुखांनी विधानसभेत केली.
विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार खडाजंगी झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवली. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला वारंवार त्रास दिला जात होता. अडचणी निर्माण केल्या जात होत्या. माझं सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असा उल्लेख डेलकर यांच्या आत्महतेपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल हे पूर्वी गुजरातमध्ये भाजप सरकारच्या काळात गृहमंत्री होते. कदाचित त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण मुंबईत आत्महत्या करतोय, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकारवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख असल्याचंही गृहमंत्री देशमुखांनी सांगितलं. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलानेही आपल्याला पत्र लिहिलं. त्या पत्रातही प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर आरोप करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
मोहन डेलकर यांना त्रास गुजरातमध्ये आणि ते महाराष्ट्रात आत्महत्या करतात, म्हणजे त्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रशासनावर विश्वास असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केलाय. इतकच नाही तर नागपूरमध्ये मध्यप्रदेशातील अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांच्याही आत्महत्येचा उल्लेख केला. त्यांनीही आपल्याला महाराष्ट्रात न्याय मिळेल म्हणून आत्महत्या केली असावी, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय.