नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जगातील ७ आश्चर्यांपैकी एक शुभ्र रंगाचा ताजमहाल हळूहळू हिरवा होत चालला आहे. बदल एका छोट्या किड्यामुळे होत असल्याचं समोर आलंय. हा किडा गोल्डी काइरो नोमस म्हणून ओळखला जातो.
यमुना नदीतून हे किडे ताजमहालावर जाऊन चिकटतात. जिथे हे किडे बसतात तिथला चमकदारपणा निघून जातो. अशास्थितीत ताजमहालची सुंदरता जपण्यासाठी भारतीय पुरातत्व खातं काम करत आहे. ताजमहालाला या किड्यांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारतीय पुरातत्व खात्याचे सुपरिटेंडेंट डॉक्टर एम. के. भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डी काइरो नोमस नावाचा हा किडा खूप लहान असतो. साध्या डोळ्यांना हे दिसतही नाहीत. ताजमहालाला या किड्यांपासून वाचवण्यासाठी पुरात्तव खात्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पुरातत्व खात्याची केमिकल ब्रँच यासाठी काम करत आहे. जिथे हे किडे बसतात तो भाग धुतला जातो आणि भींती पुसल्या जात असल्याचंही भटनागर यांनी सांगितलं.
त्यांचा ठराविक काळ संपल्यानंतर हे किडे आपोआप निघून जातात. ताजमहालच्या सुंदरतेमुळेच दरवर्षी कोट्यवधी पर्यटक या वास्तूला भेट देत असतात. मात्र, हे लहान किडे ताजमहालची सुंदरता बिघडवण्याचं काम करत आहेत.
कोरोना महामारीचा फटका ताजमहालच्या पर्यटकांवरही पाहायला मिळत आहे. सध्या परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाढ होत आहे. अमेरिकेचे लष्करी अधिकाऱ्यांची एक टीम लवकरच ताजमहाल पाहण्यासाठी येत असल्याची माहिती मिळतेय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतात आल्यानंतर ताजमहालला भेट दिली होती.