श्रीनगर (वृत्तसंस्था) पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानं पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केल्याचा परिणाम पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसू लागला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील चार दहशतवादी तळ बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला उत्तर देत असताना भारतीय लष्कराकडून दहशतवादी तळांवर हल्ले केले जाण्याची भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळेच पाकिस्ताननं हे पाऊल उचललं आहे.
गुप्ततर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्चला पाकव्याप्त काश्मीरमधील निकियालमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अशफार बडवाल उपस्थित होते. निकियाल भाग काश्मीरमधील राजौरी सेक्टरजवळ येतो. निकियालमध्ये असणारे चार दहशतवादी तळ बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हे तळ बडवालकडून चालवले जातात. त्यामुळेच तळ बंद करण्याच्या सूचना आयएसआयकडून थेट त्यालाच देण्यात आल्या.
पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या गोळीबाराला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. भारताकडून दहशतवादी तळांवर हल्ला केला जाऊ शकतो, या भितीनं पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकव्याप्त काश्मीरमधील निकियाल आणि कोटलीमधील प्रत्येकी एक-एक दहशतवादी तळ बंद करण्याचा घेण्यात आला. हा परिसर काश्मीरच्या सुंदरबनी आणि राजौरी सेक्टरपासून अतिशय जवळ आहे. निकियाल, कोटली सोबतच पाला आणि बाघामधील दहशतवादी तळदेखील बंद करण्याच्या सूचना आयएसआयकडून करण्यात आल्या आहेत. हे तळ जैश-ए-मोहम्मदकडून चालवले जात होते.