निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवरील हल्लाप्रकरणातील फरार संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूकविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर तरसोद येथे झालेल्या हल्लाप्रकरणातील विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय-२८, रा. शंकरराव नगर) याला शनिवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या सोबतच नशिराबाद पोलिसांनी मयूर पाटील याला साकेगाव येथून अटक केले. या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या आता १० झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे कारवाई करण्यासाठी गेलेले असताना त्यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केला होता. यातील मुख्य संशयित विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा सपकाळे हा पाचोरा बसस्थानक परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, राजेश मेंढे, पोलिस नाईक विजय पाटील यांच्यासह पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राहुल बेहेरे यांनी शनिवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता विशाल सपकाळे याला ताब्यात घेत नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.

Protected Content