नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शेतकरी संघटनांनी गुरुवारी एक बैठक घेतली होती. यामध्ये केंद्राकडून कृषी कायदे मागे न घेण्यात आल्यास देशभरात रेल्वे ट्रॅक रोखण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. १२ डिसेंबर रोजी दिल्लीला घेराव घालण्याचाही इशारा आंदोलकांनी दिलाय.
कृषी कायद्यांचा निषेध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज १६ वा दिवस आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केलीय.
सिंघू सीमेच्या रेड लाईटवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी लामपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी रेड लाईटवरच ठाण मांडलं होतं. तेव्हापासून हा रस्ता आंदोलकांनी रोखून धरलाय. त्यानंतर पोलिसांकडून या आंदोलकांवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं तसंच महामारी कायद्यासहीत इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. ७ डिसेंबर रोजी अलीपूर पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आली होती.