खंडणी मागितली नाही; टोल नाक्यातच मोठा झोल ! : जगनभाई सोनवणे

भुसावळ प्रतिनिधी | नशिराबाद येथे सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसून येथे मोठ्या प्रमाणात झोल होत आहे. आपण येथून खंडणी मागितली नसून येथील घोळ उघड करणार असल्याचा इशारा पीआरपी आणि संविधान आर्मीचे नेते जगनभाई सोनवणे यांनी दिला. ते आज येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी नशिराबाद येथील टोल नाक्याच्या व्यवस्थापनाकडून दरमहा खंडणी मिळावी या कारणावरून पीआरपी आणि संविधान आर्मीचे नेते तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगनभाई सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज भुसावळात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगनभाई सोनवणे यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

या पत्रकार परिषदेत श्री. सोनवणे म्हणाले की, नशिराबाद येथील टोल नाका हा अवैध या प्रकारातील असा आहे. येथील मशिनरींमध्ये घोळ असून यातून मोठ्या प्रमाणात रकमेचा घपला करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही. या अनुषंगाने आपण चौकशीची मागणी केल्यामुळे हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या टोल नाक्याच्या परिसरात भुसावळ येथील काही मंडळी जाऊन बसत असून यातूनच आपल्यावर हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही. तथापि, हा गुन्हा खोटा असल्याचे जगनभाई सोनवणे यांनी पुन्हा नमूद केले.

दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे उद्या पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपात आपला पीआरपी पक्ष, संविधान आर्मी आणि अन्य दहा सामाजिक संघटना हिरीरीने सहभागी होणार असल्याची माहिती सुध्द श्री. सोनवणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Protected Content