गुलाबभाऊंना धरणगावात दिलासा : बाजार समितीवर महायुतीचा झेंडा !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या मतमोजणीत शिवसेना-भाजप तसेच संजय पवार यांच्या गटाच्या सहकार पॅनलने विजय संपादन केला आहे. या माध्यमातून पालकमंत्र्यांना धरणगावात मोठा दिलासा मिळाला आहे.
धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट ); भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीतील संजय पवार यांच्या गटाने एकत्रीतपणे सहकार पॅनल मैदानात उतारले होते. त्यांना राष्ट्रवादी, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे व कॉंग्रेस पक्षाच्या पॅनलने आव्हान दिले होते. सहकार पॅनलची धुरा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांभाळली होती. त्यांना जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार आणि आमदार चिमणराव पाटील यांची साथ होती. तर महाविकास आघाडीच्या पॅनलची धुरा माजी पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर, शिवसेना-उबाठा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आदी मान्यवरांकडे होती.
आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. यात प्रारंभी हमाल-मापारी मतदारसंघातून शिवसेना-भाजपच्या सहकार पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी यांनी बाजी मारली. या माध्यमातून सहकार पॅनलने विजयाचे खाते उघडले. यानंतर व्यापारी मतदारसंघातून अपक्ष संजय काबरा तर सहकार पॅनलच्या नितीन करवा या दोन उमेदवारांनी बाजी मारली.
यानंतर दोन्ही पॅनलमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली. मात्र यात शेवटी बाजी ही महायुतीच्या पॅनलने मारली. यात शेवटच्या वृत्तानुसार या पॅनलला १२ जागा मिळून त्यांनी निर्णायक वर्चस्व प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या असून एका जागावर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना धक्का बसला असून येथे महाविकास आघाडीने विजय संपादन केला आहे. या पार्श्वभूमिवर, जळगावात त्यांना हादरा बसला तरी धरणगावात मात्र दिलासा मिळाल्याचे दिसून आले आहे.

Protected Content