घरकूल प्रकरणाचे हिरो प्रवीण चव्हाण यांच्यावर शिंतोळे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज Special Report | जळगावातील प्रचंड गाजलेल्या घरकूल घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि अलीकडच्या काळात बीएचआर प्रकरणातही त्याच तडफेने काम करणारे सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांच्याबाबतचे व्हिडीओ जारी करून देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे. चव्हाण यांनी याचा इन्कार केला असला तरी स्वच्छ प्रतिमा असणार्‍या या तडफदार सरकारी वकिलांवर यामुळे नक्कीच शिंतोळे उडाले आहेत.

जिल्हाच नव्हे तर राज्यातही जळगाव येथील घरकूल घोटाळा गाजला. तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील या घोटाळ्यात तब्बल ४८ माजी मंत्री, आमदार, आजी-माजी नगरसेवक आणि तत्कालीन नगराध्यक्षांना शिक्षा झाली आहे. यामुळे सुरेशदादा जैन यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली असून अनेकांच्या वाटचालीवर यामुळे संकट आलेले आहे. घरकूल प्रकरणात फिर्याद दाखल करणारे प्रवीण गेडाम आणि याचा तपास करणारे आयपीएस अधिकारी ईशू सिंधू यांच्यासह या खटल्याची न्यायालयात अतिशय समर्थपणे बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांचा देखील तितकाच मोलाचा वाटा होता. अतिशय कर्तव्यदक्ष अशा चव्हाण यांची या खटल्यानंतर ऍड. उज्वल निकम यांच्याशी तुलना देखील करण्यात आली.

यानंतर बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात देखील प्रवीण चव्हाण यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर या खटल्यात आपल्याला न्याय मिळेल अशी आशा ठेविदारांना वाटू लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत आमदार गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप करतांना थेट प्रवीण चव्हाण यांचे चित्रीकरणच सादर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात आरोप केल्यानंतर ऍड. प्रवीण चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना हे आरोप खोडून काढले आहेत. संबंधीत चित्रफितीतील आवाज आपला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते सुप्रसिध्द कायदेतज्ज्ञ असून ते कायद्याच्या भाषेत आणि अचूक बोलले आहेत. आज फडणवीस यांनी केलेले आरोप हे न्यायालयात टिकणारे नाहीतच. मात्र यामुळे निर्माण झालेला संशयकल्लोळ हा महाविकास आघाडी सरकारच्या विश्‍वासार्हतेवरील मोठा डाग ठरणारा आहे. यासोबत ऍड. प्रवीण चव्हाण यांच्यासारखी अतिशय उज् जवल प्रतिमा असणार्‍या सरकारी वकिलाच्या प्रतिष्ठेवरही यामुळे शिंतोळे उडालेत हे कुणाला नाकारता येणार नाहीच.

Protected Content