धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढ जागीच ठार

रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |आशाबाबा कॉलनी जवळ रेल्वेच्या धडकेत तापी पाटबंधारे विभागातील बळीराम माधव मराठे (वय ५६, रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता आशाबाबा नगरजवळील रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीत बळीराम मराठे हे वास्तव्यास होते. तापी पाटबंधारे विभागात क्लर्क म्हणून नोकरी करीत होते. शनिवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१७ जवळील ८ ते १० च्या दरम्यान, रेल्वेची धडक लागल्याने बळीराम मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती लोकोपायलट यांनी रेल्वे पोलीसांना दिली. त्यानुसार आरपीएफ विनोद साळवे यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ राजेश चव्हाण, पोलीस नाईक कालसिंग बारेला, नितेश बच्छाव, अजीज शहा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतहेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, मुलगा लोकेशन, आणि दोन मुली असा परिवार आहे.

Protected Content