नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आज देशात ठिकठिकाणी पडसाद उमटले. सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी आज भारत बंदचा नारा दिला होता.
भारत बंदबरोबर शेतकरी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केलं आहे. देशभरात भारत बंद पाळण्यात आल्यानंतर आता उद्या सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, उद्याच्या बैठकीपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
शाह यांनी शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली असून, सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. सकाळी अमित शाह यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ही बैठक अनौपचारिक असणार आहे. या बैठकीत १३ सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.