दहावीचा निकाल जाहीर; यंदा देखील मुलींनी मारली बाजी

मुंबई प्रतिनिधी । राज्य शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल आज लागला असून यात तब्बल ९५.३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा देखील मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी राज्याचा दहावीचा निकाल जाहीर केला. या प्रसंगी राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे विद्यार्थांचा निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाईव्ह ) पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला.

यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८. ७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९२.०० निकाल औरंगाबाद विभागाचा लागल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.

यंदा दहावीचा निकाल हा थेट १८ टक्क्यांनी वाढला आहे. कोरोनामुळे यंदा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. मुलांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी निकाल जास्त लागला आहे. राज्यातील १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के असून कोकणनंतर विभाग कोल्हापूर दुसर्‍या क्रमांकावर तर पुणे विभाग तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Protected Content